
विनायक दामोदर सावरकर ह्यांचा जन्म भगूर नाशिक येथे २८ में १८३३ मध्ये झाला.
आईवडिलांच्या माघारी त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि वाहिनीने त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासुनच ते अतिशय बुद्धिमान होते. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात शिकत असताना स्वदेशीचा फटका आणि स्वातंत्र्याचे स्तोत्र ह्या रचना केल्या. चापेकर बंधूंना फाशी झाल्यावर लहानग्या सावरकरांनी आपली कुलदैवत भगवती हिच्यापुढे शप्पथ घेतली-
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’
लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. १९०५ साली त्यांनी विदेशी कापडाची होळी केली तसेच, सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ही जगासमोर मांडले.
‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर‘ या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा ‘पहिले स्वातंत्र्यसमर’ असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला). इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले.
त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी ‘Essentials of Hindutva‘ हा ग्रंथ लिहिला.
विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर‘ सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते.
इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते.
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभूःपुण्यभूश्चैवस वै हिन्दुरितिस्मृतः॥
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले.
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५००हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत.. त्यांच्या “सागरा प्राण तळमळला“, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा“, “जयोस्तुते“, “तानाजीचा पोवाडा” ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.’सागरा प्राण तळमळला’ या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.
१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले…✍️